सातारा: 'शासकीय अधिकाऱ्यांनी सैराट होऊ नये.' असा इशारा देत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड बंदचं आवाहन केलं आहे. प्रांताधिकारी किशोर पवार यांच्याकडून कारवाईच्या नावाखाली मनमानी सुरू असून जनतेला वेठीस धरलं जातं आहे. असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केला आहे.

 

प्रांताधिकारी किशोर पवार यांनी वाळू माफियांविरोधात कारवाई सुरू केली असून वाळू माफियांचे 52 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तर 29 ट्रक्स आणि 20 बोटीही जप्त केल्या आहेत. या कारवाई दरम्यान वाहतूकदार सचिन पवार जखमी झाला आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांची कारवाई योग्य नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. त्यांनी आज जखमी सचिन पवारची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसंच प्रांताधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात उद्या कराड बंदंच आवाहन केलं आहे.

 

प्रांताधिकारी मनमानी करुन जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शासकीय कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये. असा इशाराही उदयनराजेंनी दिला.