मुंबई : कलम 370 चर्चेदरम्यान संसदेत केलेल्या भाषणानंतर घराघरात पोहोचलेले, देशातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या लेह मतदारसंघातील भाजपचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'मध्ये सहभागी झाले होते. तरुण नवीन खासदार असताना संसदेत भाषणाला कशी संधी मिळाली याचा किस्साही त्यांनी सांगितला.
आम्ही जम्मू काश्मीर भागातील असल्याने कलम 370 वर बोलणे आमचा हक्क आहे, असं मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. लोकसभा, राज्यसभेत कलम 370 वर चर्चा सुरु असताना मी बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझ्या मनात असलेल्या 17-18 मुद्यांची सूची केली. एका नेत्याने मला भाषणाची संधी मिळेल असं आश्वासन दिलं. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होईपर्यंत मला लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली नाही. मला वाटलं आजही संधी मिळणार नाही. मात्र उशीरा पण ज्यावेळी मी बोलायला सुरुवात केली त्यावेळी मी सलग 19 मिनिटाहून अधिक वेळ भाषण केलं. एवढे मोठे नेते सभागृहात असताना मला बोलण्याची संधी मिळाली ही अभिमानाची बाब आहे, असं जामयांग नामग्याल यांनी सांगितले.
कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये मोठा बदल झाला आहे. देशातील खुप कमी लोक लडाखमधील लोकांना ओळखत होते. मात्र गेल्या वर्षभरात लडाख चर्चेत असल्याने नवी ओळख मिळाली. लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश बनल्याने तेथील नागरिकांचं मनोबल वाढलं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख एकत्र असल्याने खुप अडचणी येत होत्या. मात्र विभाजनानंतर लडाखमधील नागरिकांचं जीवन बदललं आहे. सरकारी कामे वेगाने होऊ लागले आहेत. भारत सरकारकडून लडाखसाठी मिळणारा निधी देखील वाढला आहे, अशी माहिती जामयांग यांनी दिली.
भारत-चीन सीमेवरील वादावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सीमेवरील भागातील परिस्थितीचा मी स्वत: आढावा घेतला आहे. मीडिया दाखवते तशी नाही. चीन पेक्षा मीडिया जास्त घाबरवत आहे. स्थानिक नागरिक शांततेनं जीवन जगत आहेत. 2014 आधीच्या सरकारने भारत-चीनवर लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा टोलाही त्यांनी लगावला.