नागपूर : विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले भाजप आमदार परिणय फुके हे विजयी रॅलीत कुख्यात गुंड संतोष आंबेकरसोबत दिसले. फुकेंनी गुंड संतोष आंबेकरची गळाभेटही घेतली.
मूळचे नागपूरकर आणि नुकतच भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडले गेलेल्या आमदार परिणय फुके यांच्या भंडारातील विजय रॅलीत नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकर दिसून आला. नागपूरच्या गुन्हेगारी जगतातील डॉन मानला जाणारा संतोष आंबेकर रॅलीत नुसता दिसलाच नाही. तर नवनिर्वाचित आमदारांनी त्याची गळाभेट घेतली.
कुख्यात गुंड संतोष आंबेकर आपल्या किती जवळचा आहे, याचा पुरावाच नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी दिला आहे. त्यामुळे नागपुरात भाजप नेत्यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत, हे विरोधकांचे आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दरम्यान, कुख्यात गुंड संतोष आंबेकरला विजयी नेत्यांच्या विजय रॅलीत जाण्याची जुनी सवय आहे. 2014 मध्येही हाच संतोष आंबेकर भाजपचे नागपुरातून आमदार विकास कुंभारे आणि आमदार मिलिंद माने यांच्या विजय रॅलीत थेट रथावर दिसला होता. तेव्हाही नागपुरात सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
कुख्यात गुंड संतोष आंबेकरची पार्श्वभूमी काय?
संतोष आंबेकर कुख्यात गुंड असून त्याच्यावर तीनवेळा मकोकाची कारवाई झाली आहे. पहिले दोन वेळा उसाचं न्यायालयातून त्याची सुटका झाली असली, तरी सध्या मकोकाच्या तिसऱ्या प्रकरणात तो जामिनावर आहे. शिवाय, त्याच्या विरोधात हत्या प्रकरणही आहे. खंडणी मागण्याचे अनेक आरोप आणि प्रकरण त्याच्या विरोधात असून नागपुरात व्यापाऱ्यांचा तो कर्दनकाळ मानला जातो. धमकावणे, खंडणी वसूल करणे, संपत्ती बळकावणे असे आरोप ही त्याच्या विरोधात आहे.