जळगाव : खरेदी केलेल्या तांदळापेक्षा बिलामध्ये 88 रुपये जास्त रक्कम आकारली म्हणून जळगाव शहरातील डी मार्ट व्यवस्थापनाला ग्राहक मंचाने दणका दिला. महिन्याभरात दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने डी मार्टने दिले आहेत.
जळगाव शहरातील व्यवसायाने वकील असलेल्या विजय दाणेज यांनी 2014 मध्ये शहरातील डी मार्ट येथून किराणा खरेदी केला होता. या किराणामध्ये त्यांनी 6 किलो तांदूळ खरेदी केला होता. घरी गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की आपण खरेदी केलेल्या 6 किलो तांदळाचे बिल 8 किलोच्या हिशेबाने पकडून त्यांच्याकडून 2 किलो तांदळाचे 88 रुपये अधिकचे वसूल करण्यात आले होते.
या प्रकरणात आपली फसवणूक झाले असे लक्षात आल्यावर दाणेज यांनी डी मार्ट व्यवस्थापनाला आपल्याकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे लक्षात आणून दिले. मात्र, त्यांचे समाधान न करता त्यांना उडवाउडवीची उत्तरे प्रशासनाने दिल्याचे दाणेज यांनी म्हटले.
आपल्या प्रमाणे अनेक ग्राहकांची अशीच फसवणूक केली जात असेल आणि डी मार्ट प्रशासन अधिकची कमाई करीत असेल, असे त्यांच्या लक्षात आले आपल्यासारखी इतरांची या पुढे फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या वकिलीचा उपयोग करून त्यांनी डी मार्ट व्यवस्थापनाविरोधात ग्राहक मंचामध्ये नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. त्यांना झालेला मानसिक त्रास आणि झालेली फसवणूक काही अंशी ग्राह्य धरून ग्राहक मंचाने एक महिन्याच्या आत दहा हजार रुपये नुकसान विजय दाणेज यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.