Mukta Tilak Death : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta tilak) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. मागील काही महिन्यापासून सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. अखेर आज (22 डिसेंबर) त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमधे अखेरचा श्वास घेतला.
2019 मध्ये पुण्यातील कसबा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. त्याआधी अडीच वर्षं पुण्याच्या महापौर होत्या. सलग चारवेळा पुणे महापालिकेच्या नगरसेविकादेखील होत्या. लोकमान्य टिळकांच्या पणती सुन म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. मात्र आमदार झाल्यावर त्यांना लगेच कर्करोगानं ग्रासलं होतं. मात्र राज्य सभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत अत्यवस्थ असतानाही एम्ब्युलन्समधुन जाऊन मतदान केलं होतं. प्रकृती ठिक नसताना आमदारांनी पुण्याहून मुंबईला येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले होते. त्यावेळी त्यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती.
पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.
आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदार्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर 2017 मध्ये त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत.
अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली
मुक्ताताईंच्या निधनानं एक चांगला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पुण्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम लक्षात राहील, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुक्ताताई टिळक यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.