Maharashtra News: आपल्या राज्यात गेल्या वर्षभरात 100 जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात (animal attacks in maharashtra) मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे यातील 50  मृत्यू हे एकट्या चंद्रपूर (Chandrapur News Update) जिल्ह्यातील असून राज्यातील वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.


बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू वाडीत बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि आपल्या राज्याने अतिशय वेदनादायक आणि चिंताजनक असा उच्चांक गाठला. हा उच्चांक आहे वाघ-बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मानवी मृत्यूंचा. राज्यात 1 जानेवारी 2022 पासून आतापर्यंत तब्बल 100 जणांचा वाघ-बिबट-हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेलाय. विशेष म्हणजे यामध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातच 50  जणांचा वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलाय. तर त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात 23 आणि नागपूर जिल्ह्यात 9 जणांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाले आहेत.


गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि यावर्षी तर या संख्येने उच्चांक गाठलाय.


गेल्या 5 वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूंच्या संख्येवर एक नजर टाकूया.


2017 मध्ये मृत्यूंची संख्या होती 53
2018 मध्ये 50 जणांचा मृत्यू झाला
2019 मध्ये 36 तर 2020 मध्ये 88 जण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडले
गेल्या वर्षी ही संख्या होती 83 तर यावर्षी 100 जणांचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाले.


मानवी वस्तीच्या जवळ शेतशिवारात सर्वाधिक हल्ले


विशेष म्हणजे या वर्षी वाघ आणि बिबट्यांचे हल्ले हे मानवी वस्तीच्या जवळ म्हणजे शेतशिवारात झाले आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून वनविभागाने मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या भागातून यावर्षी तब्बल 7 वाघ जेरबंद केले आहे आणि आणखी 2 वाघ जेरबंद करण्याचे सावली आणि मूल तालुक्यात प्रयत्न सुरु आहे.


वाघांची संख्या वाढण्यासाठी आपल्या राज्याने केलेले प्रयत्न हे नक्कीच कौतुकास्पद आहे.  मात्र त्याच वेळी या संख्येचं योग्य व्यवस्थापन झालं नाही तर हेच वन्यजीव माणसांसाठी मोठा धोका ठरू शकतात आणि यातून एक नवीन संघर्ष उदभवेल यात शंकाच नाही.
 
 ही बातमी देखील वाचा


जयंत पाटील संतापले, अध्यक्षांसाठी अपशब्दाचा वापर; सत्ताधाऱ्यांकडून निलंबित करण्याची मागणी, विधानसभेत गदारोळ