नागपूर : भाजपचे विद्यमान आमदार आशिष देशमुख यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला दांडी मारली आणि विधानसभेतील एन्ट्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेतली. त्यामुळे आशिष देशमुखांवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी विधानभवनात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत एन्ट्री मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजूबाजूचे कार्यकर्तेही मोठ्या आश्चर्याने या दोघांच्या एकत्रित एन्ट्रीकडे पाहत होते.

आज सकाळी रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजपच्या आमदारांची कार्यशाळा भरली होती. त्यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासोबत आमदार आशिष देशमुखही अनुपस्थित होते.

...तर राजीनामा देईन : देशमुख

आशिष देशमुख यांनी 6 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आणि त्याविषयीची गरज या सात पानांच्या पत्रात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शिवाय, वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी राजीनाम्याचाही इशारा दिला आहे.

भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता आशिष देशमुखही बंडाच्या पावित्र्यात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शिवाय, राजकीय वर्तुळात चर्चाही तशा सुरु आहेत.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ’ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे.