नागपूर : जर सत्य बोलणे म्हणजे बंडखोरी असेल, तर मी बंडखोर आहे, असे भाजपचे विदर्भातील आमदार आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे आधीच नाना पटोलेंनंतर आशिष देशमुख पक्षाला राम राम ठोकणार असल्याच्या चर्चा सुरु असातना, त्यांच्या या नव्या विधानाने चर्चेला आणखीच बळ मिळालं आहे.
वेगळ्या विदर्भाची मागणी करत भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीपासून आत्मबळ यात्रा काढली. विदर्भ वेगळा हवा आणि तो नसल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत आहेत, असे देशमुख यांचे म्हणणे आहे.
"विदर्भाच्या जनतेने सरकार बदललं, पक्ष बदललं, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. बेरोजगारीच्या दृष्टीने तरुणांचे प्रश्न सुटले नाहीत.", असे म्हणत आशिष देशमुखांनी सरकारला घरचा आहेर दिला.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे मीडियाला लीक झालं. त्यामुळे देशमुख यांना आधीच पक्षाकडून नोटीस मिळाली आहे. त्यात ते आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन उभं करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुखांनी राजीनाम्याचाही इशारा दिला होता.
भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता आशिष देशमुखही बंडाच्या पावित्र्यात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शिवाय, राजकीय वर्तुळात चर्चाही तशा सुरु आहेत.
कोण आहेत आशिष देशमुख?
आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी ’ग्रामविकासाचा पासवर्ड’ पुस्तकही लिहिले आहे.