भाजप आमदार अनिल गोटेंकडून नव्या पक्षाची घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2018 05:45 PM (IST)
पक्षावर नाराज असलेले भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
धुळे : भाजपने आमदार अनिल गोटे यांना धुळ्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमधून डावलले होते. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार गोटे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी त्यांची पत्नी हेमा गोटे यांना उभे केले आहे. हेमा गोटे महापौरपदासाठी लढणार आहेत. भाजपने फसवले असल्याचे गोटे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. येत्या 9 डिसेंबर रोजी धुळे महापालिकेची निवडणूक होणार आहे. धुळे महापालिकेच्या निवडणुकीवरुन गोटे यांचा भाजप नेते व मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु आहे. त्यामुळे गोटे यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी गोटे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर फडणवीस यांनी अनिल गोटे राजीनामा देणार नाहीत, असे सांगितले. तसेच भारतीय जनता पक्ष धुळे महापालिकेची निवडणूक अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु मुख्यमंत्री फडणवीस अनिल गोटे यांची नाराजी दूर करु शकले नाहीत. त्यामुळे अखेर गोटे यांनी राजीनामा देत नव्या पक्षाची घोषणा केली आहे.