सोलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर आले. उद्योजकांच्या बैठकीला जाण्यासाठी सुभाष देशमुख यांनी गाडीऐवजी चक्क सायकल वापरली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या देशमुखांना मात्र सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.


सक्काळ सक्काळ सहकारमंत्र्यांनी सायकल चालवली आणि विरोधकांच्या हाथी आयतं कोलीत दिलं. बापूंनी आपल्या घरापासून एका बैठकीला जाण्यासाठी सायकलस्वारी केली. पर्यावरण रक्षणाचं अमृत वचन फेसबुकवर दिलं. मात्र फेसबुकवर गेम पलटी झाला, आणि सुरु झाली ट्रोलिंग

बापूंनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकल चालवली खरी, मात्र मागं असलेल्या गाड्यांचा ताफा लपला नाही. फास्ट अँड फ्युरिअसमधल्या विन डिजेलला लाजवेल असा स्टंट करत एक तरुण आपल्या बापूंची फोटोग्राफी करु लागला.





आता एवढं सगळं पाहिल्यावर विरोधक गप्प थोडीच बसणार. एक सायकल आणि मागे पाच गाड्या, उपयोग काय? अशाने प्रदूषण कमी कसं होईल? असे प्रश्न उपस्थित केले गेले.

सुभाष देशमुखांच्या मतदारसंघात छत्रपती संभाजी तलाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथं जलपर्णीने वेढा घातलाय त्यावरुनही विरोधकांनी लक्ष्य साधलं. पर्यावरण रक्षणासोबत बापूंनी कंबर तलावाचा श्वास मोकळा केला, तर मानलं.