पुणे : पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चेंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आव्हाड यांना टोला लगावलाय. "सहानुभूती मिळवण्यासाठी आमदारकीचा रजीनामा द्यायचं नाटक असून ही सर्व स्टंटबाजी आहे असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांनी पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान 354 (विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुंब्रामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून देखील अनेक नेत्यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आता बावनकुळे यांनी राजीनामा हे फक्त नाटक आणि स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे.  


राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या सुप्रिया सुळे यांच्या मागणीवर देखील बावनकुळे यांनी टीका केली.  "राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी महाराष्ट्रात काय झालं आहे हे कळलं आहे. कशाच्या आधारावर हे म्हणत आहात? अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे? त्यांचे नेते गंभीर गुन्हे करत आहेत. आव्हाडांनी गंभीर गुन्हा केलाय. त्यामुळे त्यांना निलंबित करा. काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांना निलंबित करावं. देवेंद्र फडणवीस कधीही आकसाने कारवाई करत नाहीत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा सीसीटीव्हीचे फुटेज पाहूनच झाला आहे. महिला समोरून येत होत्या तर तुम्ही मागे का नाही सरकले? तुम्ही बाजूला का नाही गेलात?  असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय.   


"अब्दुल सत्तार सुप्रिया सुळे यांच्याबाबात बोलले तेव्हा त्याचा आम्ही विरोध केला, आता सुप्रियाताईंनी आव्हाडांच्या बाजूने बोलावं का? महाविकास आघाडी सत्तेत असताना आम्ही मुघलशाही सहन केली. तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थितीत होती, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.  


दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आव्हाडांवरील कारवाई ही फक्त आकसापोटी आणि सुडापोटी करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय.  


महत्वाच्या बातम्या


Jitendra Awhad: ...त्यापेक्षा राजकारण नकोच, विनयभंगाच्या आरोपानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक