जालना : जालन्यातील भाजप नेत्यांचा उतावळेपणा पोस्टरबाजीतून उघड झाला आहे. कर्जमाफीच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पोस्टरबाजीतून आभार मानले. हे पोस्टर पाहून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार असल्याचं आश्वासन दिलं आणि भाजप नेत्यांनी जणू कर्जमाफी झाली असल्याचा आव आणायला सुरवात केली.
जालना जिल्हा भाजपच्या वतीने जालना-औरंगाबाद महामार्गावर पोस्टरबाजी सुरु करण्यात आली आहे. जालना जिल्हा भाजपच्या वतीने लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आभार मानले गेले आहेत.
विशेष म्हणजे अजून शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळाली नाही आणि भाजपने अशी पोस्टरबाजी सुरु केल्यानं भाजपविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.
जालना-औरंगाबाद रोडवर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी अशा प्रकारचे पोस्टर लावलेले पाहायला मिळत आहेत.