मुंबई : एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरु असला तरी शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण येत्या 48 तासानंतर मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे.
त्याआधी आज भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागामध्ये गारपीठही झाली. तर मराठवाड्यातील लातूरमध्ये आज दुपारी पवासाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
कोकणातही पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस बरसला. तर पुढच्या 48 तासात मान्सून परिस्थिती पूर्ववत होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्राकडे सरकणार आहे.
वादळी पावसामुळे इंदापूरात दोघांचा मृत्यू
इंदापूर तालुक्यात काल रात्री वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. भाटनिमगाव येथील वृद्ध बाबा निवृत्ती कांबळे यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
शेटफळगडे येथील विठ्ठल नारायण मुळीक यांच्या अंगावर वीज वाहिनीची तार पडल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. तर काही ठिकाणी घरांची पत्रे उडून गेली आहेत.
तालुक्यातील पश्चिम आणि दक्षिण भागात वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. अनेक भागातील केळी, आंबा आणि डाळिंबाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तर केळीच्या बागा अगदी भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.