अहमदनगर : शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्या कडेला आधी पोपटवाले बसायचे, तसे अनेक पोपटवाले सध्या वाढले आहेत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil ) यांना लगावला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीचे अधिवेशन संपल्यावर विद्यमान सरकार पडेल असं जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
"महाविकास आघाडीचे नेते भ्रमिष्ट झाल्यासारखे वागतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले की काय असं वाटायला लागले आहे. सत्ता गेल्याचं किती वैफल्य असावं. आमचं सरकार भक्कम आहे, अडीच वर्षे पूर्ण करणार आणि पुढचे 25 वर्ष आम्हीच असणार आहोत, असं विखे पाटील यांनी म्हटलंय. विखे पाटील यांनी यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर देखील टीका केली. "यांनी आता सामजिक कामं हाती घेतली पाहिजेत. त्यांच्यासाठी त्यांनी वेळ खर्च केला पाहिजे. जनता त्यांच्या वक्तव्यावर पाठीमागे हसते याचं भान त्यांना नाही असा टोला त्यांनी चंद्रकांत खैरे यांना लगावला. शिंदे गटाच्या आमदारांची आमदारकी रद्द होईल म्हणून काँग्रेसचे 22 आमदार आपल्या जवळ ठेवले आहेत असं चंद्रकांत खैरे यांनी म्हंटलं होतं. त्यावरून विखे पाटील यांनी खैरेंवर टीका केली.
दरम्यान, सभांच्या परवानगीवरून सध्या राजकारण तापले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभांना राज्य सरकार आडकाठी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. परंतु, यावर देखील विखे पाटील यांनी टीका केलीय. "त्यांच्या सभांना कुणीही परवानगी नाकारलेली नाही. त्यांच्या सभांना गर्दी होत नाही म्हणून त्यांनी सभा घेतल्या नाही असं राधाकृष्ण विखे म्हणाले.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबीरात बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर पडेल, असं म्हटलं आहे. “आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं. हे अधिवेशन झाल्यावर सरकारच पडणार. राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही. कारण आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही. आता काँग्रेसचं अधिवेशन झालं, तेव्हा माहिती नाही, कुणाचं सरकार होतं. पण ते पडलं. आता आमचं अधिवेशन झालं, तर सध्याचं सरकार पडेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.