मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आज भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राजकारणात आले नसते तर काय केलं असतं याबाबत देखील सांगितलं. "मी आज एक गुपित सांगते की मला खूप प्रसिद्ध व्हायचं होतं, त्याचबरोबर मला क्रिएटिव्ह फिल्डमध्ये राहायला आवडलं असतं. राजकारणात आले अनसते तर आज मी लेखिका झाली असते. माझ्या आयुष्यातील अनुभवावर काहीतरी लिहावं असं वाटतंय, माझं जीवन माझ्यासाठी स्फोटक नाही. परंतु, आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपण बोलू शकत नाही त्या लिहिल्या जातात, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. 


पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील अनेक आठवणी यावेळी उलगडल्या. "कॉलेजच्या मुलांना बघितले की आपण आता म्हातारे झाल्यासारखं वाटतं. मी कॉलेजमध्ये असताना गोपिनाथ मुंडे गृहमंत्री होते. त्यामुळे मला कॉलेजमध्ये असताना पण बॉडी गार्ड होता. आजच्या घडीला साहेबांची उणीवर खूप जाणवते. त्यांनी आम्हाला सेवा करायची संधीच दिली नाही. साहेबांना रक्त कमी पडल असतं तर जगातल्या लोकांनी रक्त दिलं असतं. त्यांनी आम्हाला संधी द्यायला हवी होती, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 


"वडिलांना मी आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीला नाही बोलली नाही. साहेब होणं खूप कठीण आहे. ताईसाहेब होणं हे त्याहून कठीण आहे. माझा स्वभाव म्हणजे घटना घडल्यावर काय करायचं असा आहे. मन मोकळं व्हायला काही जवळचे मित्र मैत्रिणी आहेत, त्यांचाकडे मी बोलत असते. 2019 नंतर माधुरी मिसाळ यांनी मला मायेचा हात दिला. कठीण काळी आमची आई खूप खंबीर असते. पण कधी घरात एखादं झुरळ आलं तर ती लहान बाळ असते.  राजकारणाचा मोह तिला कधी वाटला नाही. मी संयमी आहे, त्यामागे कारण म्हणजे माझी आई. साहेब आणि माझ्यात तुलना करतात तेव्हा 95 टक्के चांगले वाटते, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. 


गेल्या चार वर्षात राजकारण किंवा जीवनातीव प्रवासाने एक धडा दिलाय का? या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "तुम्ही स्पष्ट असाल तर तुमच्या भोवती असणारे लोकांचं वलय तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. लोकांच्या टाळ्या हाच आमचा ऑक्सिजन आ वयस्कर आणि आदरणीय लोकांसमोर मला झुकायला आवडतं. पण मला काहीतरी मिळावं यासाठी कोणासमोर झुकण मला पटत नाही. मी संयमी आहे, माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. कुठलीही परिस्थिती कायम राहत नसते, वाईट दिवस जातात. राजकारणात बरच काही राहून गेलय आणि ते मिळवण्याची इच्छा आहे."