नागपूर : "सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल विचार केला पाहिजे. महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटायला लागलंय, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व्यक्त केलं आहे.
नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी राजकारणाच्या नेमक्या अर्थावरच काही प्रश्न उपस्थित केले. सध्याचं राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण असल्याचं गडकरी यांनी म्हटलय.
नितीन गडकरी म्हणाले, "एखादा व्यक्ती जीवन किती जगला, यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं आहे. माणसाच्या कर्तृत्वाचा निवडून येण्याशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही."
"राजकारणात गुणात्मक परिवर्तन एक प्रक्रिया आहे. थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळत असते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे. माझं कल्याण व्हावं असं आपल्या संस्कृतीत लिहिलेलं नाही, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या