अकोला : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आज वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान देगाव येथे शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करीत त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलीसांनी शिवसैनिकांवर लाठीमार केला. दरम्यान, खासदार भावना गवळी यांनीही पत्रकार परिषद घेत सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या दौऱ्यानं वाशिमचं राजकीय वातावरण 'गरम'
भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. खासदार गवळींवर 100 कोटींच्या भ्रष्टाचारासंदर्भात सोमय्या यांनी ईडीसह डझनभर यंत्रणांकडे तक्रारी केल्यात. आज सोमय्या यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम येथे दौरा केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वाशिम जिल्ह्यातील रस्त्याच्या कामात शिवसैनिक खोडा घालत असल्याचा आरोप केला होता. आज सोमय्यांनी रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील पैनगंगा नदीवरील अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाची केली पाहणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शिवसेना कार्यकर्त्यांनी हे काम थांबविल्याचा आरोप केला होता. दरम्यान, भावना गवळींच्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांचा पाठींबा असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्यांनी एबीपी माझाशी बोलतांना केला आहे.
पत्रकार परिषदेत खासदार भावना गवळींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप :
यावेळी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. खासदार गवळींवर 100 कोटींच्या भ्रष्टाचारासंदर्भात सोमय्या यांनी ईडीसह डझनभर यंत्रणांकडे तक्रारी केल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय. रिसोड पोलिस स्टेशनमध्ये भावना गवळी यांनी 7 कोटी रूपये चोरी झाल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात पोलिसांकडे काहीच माहित नसल्याचं सोमय्या म्हणालेत. पोलिस कोणताच तपास करीत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. रक्कम नेमके कुठून चोरीला गेली? . एव्हढी रक्कम कुठून आली? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलेत. मुख्यमंत्र्यांनी एव्हढी रक्कम कशी आली याचं उत्तर द्यावं, असं ते म्हणालेय. हा पैसा रस्त्यांच्या वसुलीतून आला होता का? असा सवालही सोमय्यांनी यावेळी केला.
55 कोटींचा बालाजी पार्टिकल कारखाना भावना गवळींना फक्त 25 लाखांत कसा मिळतो? असा सवाल सोमय्या यांनी केला. कारखान्याच्या सर्व पदांवर अन विक्री निविदा प्रक्रियेत भावना गवळीच कशा? असाही सवाल सोमय्यांनी सरकारला विचारला आहे. खासदार भावना गवळींच्या संस्थेच्या खात्यातून 10 कोटींची रक्कम एकाचवेळी कशी काढली जातेय असा प्रश्न विचारतांनाच भावना गवळींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. पुढच्या दोन आठवड्यात भावना गवळींवर गुन्हे दाखल होणार असल्याची भविष्यवाणी यावेळी सोमय्या यांनी व्यक्त केली. दरम्यान, आज झालेल्या देगावातील राड्यावर सोमय्यांची प्रतिक्रिया देतांना शिवसैनिकांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं सोमय्या म्हणालेत.
देगावात झाला राडा :
रिसोड तालुक्यातील देगाव येथे शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना दाखविले काळे झेंडे दाखविलेत. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या दगडफेक करीत गाडीवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी शिवसैनिकांवर पोलिसांचा लाठीमार करावा लागला.
आज काय-काय झाले किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात :
- किरीट सोमय्या 9.30 वाजता अकोल्यावरून रिसोडकडे रवाना
- ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून सोमय्यांचं स्वागत
- सोमय्यांकडून केशवनगर जवळच्या पैनगंगा नदीवरील पुलाची पाहणी.
- शिवसैनिकांच्या हस्तक्षेपामुळे पुलाचं बांधकाम रखडल्याचा नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख.
- देगाव येथे शिवसैनिकांकडून सोमय्यांच्या गाडीवर शाईफेक. काळे झेंडे दाखविले.
- शिवसैनिकांवर पोलीसांचा लाठीमार. त्यामुळे सोमय्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केलेला भावना गवळीचा बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना पाहण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला.
- खासदार भावना गवळीच्या कार्यालयातून 7 कोटींची रक्कम चोरी प्रकरणी माहिती घेण्यासाठी सोमय्या रिसोड पोलीस स्टेशनमध्ये. पोलीसांना विचारला जाब.
- वाशिममध्ये सोमय्यांची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप. यानंतर त्यांचा दौरा समाप्त करीत अकोल्याचे प्रयाण
खासदार भावना गवळींनी फेटाळलेत सर्व आरोप :
आज वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्या संस्थेनं घेतलेला बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना, कार्यालयातून चोरी झालेले 7 कोटी रूपये आणि 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत. खासदार भावना गवळी यांनी हे सर्व आरोप एक पत्रकार परिषद घेत फेटाळून लावलेत. भूमाफियांनी हे आपल्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र असल्याचा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.
या संपुर्ण आरोप-प्रत्यारोपात खरी तथ्य जनतेसमोर येणं महत्वाचं आहेय. किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खासदार भावना गवळी यांचं 22 वर्षांचं राजकीय करियर मात्र पणाला लागलंय. सरकारनं या आरोपांची निष्पक्ष चौकशी करीत दुध का दुध, पाणी का पाणी करावं, हिच अपेक्षा.