Girish Mahajan : "येत्या दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप (Bjp) नेते गिरीश महाजन यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विजेचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. भारनियमनामुळे (Load Shedding ) शेतकऱ्यांची पीकं जळून जात आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र असताना आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते एसीमध्ये बसून हे सर्व पाहात आहेत. परंतु, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही ठोस उपाय किंवा निर्णय घेताना दिसत नाहीत, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावमध्ये आज भारनिमनाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "आघाडी सरकार मधील उदासीनता पाहून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही आणि भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर जळगाव जिल्ह्यातील सर्व रस्ते बंद करण्यात येतील. शिवाय एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही."
दरम्यान, भाजपने काढलेला जन आक्रोश मोर्चा हा केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात का काढला जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजपचा हा मोर्चा म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. एकनाथ खडसे यांच्या या टिकेवरही गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला.
गिरीश महाजन म्हणाले, महागाईविरोधात आघाडी सरकारने आंदोलन करून पाहावे, किती लोक येतात ते त्यांना कळेल. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत."
महत्वाच्या बातम्या