जळगाव : भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते कुणी साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब हवीय म्हणूनच हे सर्व नेते भाजपात येत असल्याचा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, ते अशा नेत्यांना धुवून घेतात, असा टोला खडसेंनी लगावला.


शिवसेनेचा दबाव घेऊ नये


नारायण राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, असं अनेक वर्षांपासून ऐकतोय. प्रत्येक पक्षाने कोणाला पक्षात घ्यावं, हा अधिकार त्या पक्षाला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनाचा दबाव घेऊ नये, असा सल्ला एकनाथ खडसेंनी दिला. युतीबाबत बोलताना, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा फायदा होईल. युती होईल अशी आशा आहे. मात्र 50-50 चा फॉर्मुला ठरलेला नाही, ते वरिष्ठ सांगतील, असं खडसे यांनी म्हटलं.



मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर


भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे. आम्ही त्यांना स्वच्छ करुन घेतो. पक्षात आलेल्यांना क्लीन चिट दिली जाते, त्यानंतर ते आपल्या कामाला लागतात. मात्र भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत. सत्तेची ऊब मिळावी यासाठी हे सगळे येत आहेत. भाजपची नीती मूल्य मान्य म्हणून सर्व येत आहेत असं नाही. पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या लोकांना पक्षात घ्यावं लागतं. मात्र चांगल्या लोकांची व्याख्या ठरवत असताना, दुमत होऊ शकतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.


जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींनी जन्मठेव व्हावी


जळगाव घरकुल घोटाळ्याच्या निकालाचं एकनाथ खडसे यांनी स्वागत केलं. सुरेश जैन यांना शिक्षेसाठी उशीर झाला. नेहमीच त्यांनी सत्ताधारी पक्षात जाऊन संरक्षण घेतले, नाहीतर 2 वर्षात या प्रकरणाचा निकाल लागला असता. याप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे होती. आरोपींना जन्मठेप मिळावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असं खडसे म्हणाले.