कोल्हापूर : मराठा समाजासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्याचबरोबर आता सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असेही त्यांनी नमूद केलं आहे. खासदार संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नी प्रयत्न करत असून लवकरच पंतप्रधान त्यांना भेट देतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पण हा मुद्दा केंद्र सरकारचा नसल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


पावसाने मुंबई पुन्हा तुंबल्याने त्यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर टीका केली. जगात विविध तंत्रज्ञान उपलब्ध असताना त्याचा का वापर केला जात नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काम दिल्याने मुंबईची अशी अवस्था होत असल्याची टीका त्यांनी केलीय. मुंबई पालिका कायम शिवसेनेकडे आहे. नागरी सुविधा देण्यात मुंबई पालिका कमी पडते. सरकारमध्ये आणि पालिकेतही शिवसेना आहे. मग काय अडचण आहे हे कळत नाही. दर वर्षी मुंबईत पाणी साचतं, त्यावर नियोजन नको का करायला. शिवसेनेचं नेहमी आलेला दिवस ढकलण्याचे काम चालले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


पावसाने राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ मराठवाडा याठिकाणी खूप नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी आता मातोश्री वरून बाहेर पडण्याची गरज त्यांनी व्यक्त करत ओला दुष्काळ जाहीर करण्याची आता वेळ आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.



मातोश्रीवरुन बाहेर पडून दौरे काढले पाहिजेत


मुख्यमंत्र्यांनी घरात बसून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दौरे केले पाहिजेत. 7 तास काम करून होत नाही, 18 तास काम करावं लागतं. उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडून कामाला लागलं पाहिजे, असं ते म्हणाले. आम्ही अनेकवेळा मागणी केली होती की मातोश्रीमध्ये बसून राज्याचा कारभार हाकता येत नाही. संकट काळात मुख्यमंत्र्यांनी दौरे काढून यंत्रणेला जाग करणं गरजेचं असतं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे यंत्रणा कामाला लागते. मात्र आमचे मुख्यमंत्री कधी मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत. बैठका वर्षा किंवा मंत्रायलात घ्यायला हव्यात. मात्र यांच्या बैठका महापौर बंगल्यात होतं असतात. सर्व काही आपल्या मर्जीप्रमाणे सुरू आहे ते काय बरोबर नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.