मुंबई : परमबीर यांनी केवळ गृहमंत्र्यांवरच नव्हे तर ठाकरे सरकारवर आरोप केल्याचं सांगत उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांचे गॉडफादर असल्याची टीका भाजपनेते नारायण राणे यांनी केली. सचिन वाझे यांना खंडणी वसूल करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला.
परमबीर सिंह यांचा रोख केवळ गृहमंत्र्यांवर नसून त्यांचा रोख मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगत नारायण राणे म्हणाले की, सचिन वाझे यांना क्राईम ब्रँचमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणले आणि कोणत्याही नवीन प्रकरणाचा तपास त्यांनाच द्यावा असाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. गेले काही महिने सचिन वाझे कधी वर्षावर तर कधी ओबेरॉय मध्ये राहत असल्याचंही नारायण राणे म्हणाले.
सचिन वाझे यांना खंडणी वसूली करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्यांना अटक होऊ नये यासाठी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनीच प्रयत्न केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. परमबीर यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही असा सवालही नारायण राणे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्रीच सचिन वाझेचे गॉडफादर असून मनसुख हिरण याच्या सारख्या निरपराधाला मारण्याचं पाप मुख्यमंत्र्यांनी केलं असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नको पण पहिला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे म्हणाले की, "राज्यात लोकांचे प्रश्न मागे राहिलेत, शेतकरी , कामगार आणि इतर प्रश्नही मागे राहिलेत. पैसे द्या आणि मुडदे पाडा असं या राज्यात सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काळीमा फासलाय. मागच्या इतिहासात असा मुख्यमंत्री झाला नाही. सचिन वाझेंनी आतापर्यंत कुणासाठी एन्काऊंटर केलेत याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे राज्यामध्ये असा मुख्यमंत्री आणि असा गृहमंत्री असू नये असं मला स्पष्टपणे वाटतं."
संबंधित बातम्या :
- गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप! परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमध्ये आहे तरी काय? वाचा सविस्तर...
- 'आरोप दुर्दैवी, सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं', संजय राऊतांचा सरकारला सल्ला!