Chandrakant Patil : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाल्यामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर जोरदार निशाणा लगावला आहे. शिवसैनिकांनो सावध राहा, 'बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस' असल्याचे पाटील म्हणालेत.


भाजपकडून आज सत्यजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. कोल्हापूर ही जागा सातपैकी पाच वेळा शिवसेनेनं जिंकली तर 2 वेळा काँग्रेसनं जिंकली आहे. ती जागा सेनेनं काँग्रेसला दिली आहे. यातून शिवसेनेचा कार्यकर्ता हतबल आहे. शिवसैनिक निराश आहेत. त्यामुळं या निवडणुकीत शिवसैनिकांना वाटेल ते करण्याची संधी आहे. ही संधी गेली तर काँग्रेस वरचढ होईल असे पाटील यावेळी म्हणाले. शिवसैनिकांनो सावध राहा, बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे असेही ते म्हणाले. 


भाजप विकासाच्या लढत आहे


या शहराला थेट पाईपलाईनंने शुद्ध पाणी मिळालं नाही तर विधानसभा लढवणार नसल्याचे सतेज पाटील म्हणाले होते. ते पाणी कुठे आहे. जनतेनं त्यांना जाब विचारावा असेही पाटील म्हणाले. ही निवडणूक भाजप विकासाच्या मुद्यावर लढवत आहे. 50 वर्ष महाराष्ट्रात तुमच राज्य होतं. तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी 50 वर्षात काय केलं ते सांगा असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. आम्ही पाच वर्षात कोल्हापूरसाठी काय केले याची यादी देतो. कोल्हापूर विमानतळाचे महत्वाचे काम आम्ही केलं. त्याचं विस्तारीकरण केलं. आज सगळीकडे विमाने जात आहेत. अंबाबाई मंदिरासाठी निधी दिला. तुम्ही काय केलं ते सांगा असे पाटील म्हणाले.


50 वर्ष तुमची पाच वर्ष आमची


50 वर्ष तुमची पाच वर्ष आमची, जनतेनं निर्णय करावा कोणाला मतदान करायचं ते असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आम्ही सहा पक्ष एकत्र आलो आहोत. भाजप, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम,  रयत क्रांती संघटना, विनय कोरे यांचा पक्ष, ताराराणी संघटना, महादेव महाडीक, शेतकरी संघटना अजून काही मोठ्या संघटना आमच्यात सामील होतील असे पाटील म्हणाले. त्यामुळं यांना पळता बुई थोडी करु असा टोलाही पाटील यांनी लगावला.


महत्त्वाच्या बातम्या: