मुबंई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपच्या गडांना चांगलाच हादरा बसलाय. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होतं. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र ते एकटे लढणार नाहीत, त्यांच्यात तेवढी हिंमत नाही.


या निवडणुकीत फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झालाय, शिवसेनेला भोपळा मिळाला. मित्रपक्ष सोबत नव्हता हे खरं आहे. पण मित्राला सोबत राहायचे नसेल तर त्याला आपण काय करणार. कितीही अंतर्गत कुरघोड्या केल्या तरी मित्रपक्ष सोबत असला तर फायदाच होतो. आता आम्ही चिंतन, मनन, परीक्षण, कार्यवाही सगळं करु. आता आम्हालाच ताकद वाढवावी लागेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.


शिवसेनेने आत्मचिंतन करावं- देवेंद्र फडणवीस


भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या पक्षाला एकाही जागी विजय मिळवता आलेला नाही. आम्ही तरी एका जागी विजय मिळवला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत आत्मचिंतन करुच मात्र ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.


 विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांच्या निकालात महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी बाजी मारली आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra MLC Election Results 2020: भाजपच्या गडांना हादरा, काँग्रेसला नवसंजीवनी, एकीच्या बळाचा महाविकास आघाडीला फायदा


शिक्षक, पदवीधरमध्ये भाजपला दणका, महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण जिंकलं, कोण आघाडीवर?


पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय, विजयानंतर म्हणाले...