राणेंच्या पुतळ्याच्या दहनावेळी भाजप कार्यकर्ते आपापसातच भिडले
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 03:32 PM (IST)
नागपूरः नागपूरमध्ये नारायण राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळायला निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपापसांत चांगलीच जुंपली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केल्याची घटना घडली आहे. नागपुरच्या अजनी चौकात ही घटना घडली. नारायण राणेंनी काल भाजला गुंडांचा पक्ष म्हणून हिणवलं. त्यात मुन्ना यादव यांचं नावंही घेतलं. त्याचा निषेध करण्यासाठी नागपूर भाजपच्या वतीने नारायण राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले. पुतळा बनवला. मात्र दोन कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरुन शाब्दीक चकमक झाली आणि त्यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळणं बाजुलाच राहिलं आणि भाजप कार्यकर्त्यांमधील मारहाणीची चर्चा नागपूरमध्ये सध्या रंगली आहे.