सोलापूरः भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी एका फरार आरोपीचा वाढदिवस साजरा करुन नवीन वादाला तोंड फोडलं आहे. खूनाच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या अनंत जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
पॅरोलवर बाहेर आलेले भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव गेल्या दोन वर्षापासून फरार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत नेत्यांचे पोस्टर्स लावून आरोपीचा वाढदिवस साजरा केला आहे.
कोण आहेत अनंत जाधव?
मराठा वस्तीत 2010 साली पूर्व वैमनस्यातून दीपक साबळे यांचा खून करण्यात आला होता. दलित-सवर्ण वादातून हि हत्या झाली होती. त्या खून खटल्यात अनंत जाधव हे मुख्य आरोपी होते. फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल होतं.
या गुन्ह्यात न्यायालयाने जाधव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण पॅरोलच्या सुट्टीवर येऊन अनंत जाधव यांनी पोलिसांना चकवा दिला. खुनातल्या आरोपीचे पोस्टर्स लावून भाजपने आपली प्रवृत्ती दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
'कारवाई करा, अन्यथा आंदोलन'
सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांचा कट्टर कार्यकर्ता अशी अनंत जाधव यांची ओळख आहे. न्यायालयात खुनाचा खटला चालू असतानाही 2012 साली देशमुख यांनी जाधव यांना भाजपची उमेदवारी देऊन महापालिका निवडणुकीत निवडून आणलं आहे.
खूनाच्या खटल्यात शिक्षा झाल्याने त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं. मात्र पॅरोलवर असताना दोन वर्षापासून अनंत जाधव फरार आहेत. अशा आरोपीचा भाजपाने वाढदिवस साजरा करुन आपली प्रवृत्ती दाखवली आहे. त्यामुळे याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी दिला आहे.