नागपूर : शिवसेनेसोबत युती नको अशी पोस्टरबाजी भाजपने ठाण्यात केली असताना, नागपुरातील पदाधिकाऱ्यांना युती नको आहे. भाजप हा शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू असल्याच्या प्रतिक्रिया नागपुरातील मेळाव्यात उमटल्या आहेत.


महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करावी की स्वबळावर निवडणूक लढवावी, याची चाचपणी करण्यासाठी शिवसेना आमदार आणि नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांनी विशेष मेळाव्याचं आयोजन केलं होतं.

"नागपुरात शिवसेनेची ताकत दाखवून द्या. बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा. आमची स्पर्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाही. आमचा नंबर एकचा शत्रू बेईमान भाजपच आहे," असे सूर शिवसैनिकांच्या मेळाव्यात उमटले.

राज्यपातळीवर युती करण्याचा निर्णय श्रेष्ठी घेतील. मात्र शिवसेना नागपुरात स्वबळावर सर्व 151 जागा लढवण्यासाठी तयार आहे, असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

त्यामुळे एकीकडे मुंबईत शिवसेना-भाजप युतीचे संकेत मिळत असताना नागपूरमध्ये शिवसेना पदाधिकारी युतीला विरोध करत आहेत. तर ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी युतीला विरोध करण्यासाठी पोस्टरबाजी सुरु केली आहे.