मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला साद घातली आहे. शिवसेनेसाठी आधीही दारं उघडी होती आणि पुढेही राहतील, असं मोठं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय. भाजप शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. शिवसेना आणि भाजपचं रक्त हिंदुत्वाचं आहे. त्यामुळे आपण आशावादी असल्याचं पाटील म्हणालेत.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केलं होतं. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना सोबत येण्याबाबात आपण आशावादी असल्याचं म्हटलं आहे. उद्या गोपिनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही हजेरी लावणार आहेत. एकनाथ खडसे आणि इतर नेत्यांनी तिथे जाणार असल्याचं आधीच जाहीर केलंय.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणीच पक्षातून जायचा मुद्दा नाही. पंकजा मुंडे या लहानपासून भाजपच्या सर्व कार्यक्रमात हजेरी लावत आहे. त्यामुळे राजकारणात त्या नवख्या नाहीत. या सगळ्या बातम्यांचा त्यांच्या मनाला त्रास होत आहे. ते उद्या त्या स्पष्ट करतील.

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पाठ फिरवल्यानं त्या नाराज आहेत का? याविषयी विचारल असता चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे आजारी होत्या आणि त्यामुळे त्या बैठकीस उपस्थित नव्हत्या. याविषयी त्यांनी पूर्वकल्पना दिली होती.

Pankaja Munde | मला जे काही बोलायचं आहे, ते उद्या बोलेन : पंकजा मुंडे | ABP Majha


गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी परळीत पोस्टरबाजी करण्यात आली. मात्र, या मेळाव्याच्या पोस्टरमधून कमळ हद्दपार झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान उद्याच्या मेळाव्याला स्वाभिमान मेळावा असं नाव देण्यात आलं आहे. या स्वाभिमान मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी कोणती घोषणा करणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.