मुंबई : "मला जे काही बोलायचं आहे, ते उद्या बोलेन. काय तथ्य आहे. कोणी काय निकष लावले आहेत, त्यावर उद्या स्पष्टता येईल," असा वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची उद्या (12 डिसेंबर) जयंती आहे. जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे आज परळीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी भाजपवर नाराज असलेल्या चर्चांबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी हे उत्तर दिलं.


दरम्यान, पंकजा मुंडे उद्याच्या कार्यक्रमाक एखाद्या सामाजिक संघटनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत या समाजाची एकत्र मोट त्या बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर उद्या नव्या संघटनेची घोषणा होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी उद्या 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त परळीला निघाले आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि भक्त पण निघाले आहेत. जोरदार तयारी सुरु आहे. म्हणून मी एक दिवस आधी निघाले आहे.

'जे बोलायचंय ते उद्या बोलेन'
मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पाठ फिरवल्याने त्या नाराज आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला. मात्र उद्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, असा निरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. नाराजीमुळे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारली का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मला जे काय बोलायचं आहे ते उद्या बोलेन. काय तथ्य आहे, कोणी काय निकष लावलेत यावर उद्या स्पष्टता येईल."

एकनाथ खडसेंसोबतच्या बैठकीत काय झालं?
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या भेटीविषयी पंकजा मुंडे यांनी सांगितलं की, जेवणाची वेळ होती. खडसे आणि मी काल एकत्र जेवण केलं. कौटुंबिक चर्चा केली आणि मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

ज्यांनी जाहीर केलं ते येतील
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उद्या गोपीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आज पंकजा मुंडे परळीला रवाना होताना उद्याच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, "जे मुंडे साहेबांच्या कार्यक्रमासाठी यापूर्वी येत होते, ते सर्वजण येतील. हा कार्यक्रम वेगळा आहे, कुठलाही राजकीय रंग नाही. पक्षातील ज्यांनी जाहीर केलंय ते सर्व उद्या येतील."

मेळाव्याच्या पोस्टरवरुन भाजप-कमळ गायब
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. पण महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्याच्या पोस्टरवरुन भाजपा आणि कमळ गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.