रायगड : भाजपचे सरकार हे हुकूमशाहप्रमाणे वागत आहे. जे सरकार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत नाही ते आज सत्ता करत आहे. 2019 मध्ये पुन्हा हे सरकार सत्तेत आल्यास आपले वोटिंग कार्ड घरात जपून ठेवा, अशा शब्दात पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी सरकारवर निशाणा साधला.


रिझर्व्ह बँक, सुप्रीम कोर्ट आणि सीबीआयवर आक्रमण करण्यात येत आहे. स्वायत्त संस्थांच अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोपही हार्दिक पटेल यांनी केला.


मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या दोन दिवसीय नवव्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे करण्यात आले आहे. यासाठी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना निमंत्रित करण्यात आले होते.


हार्दिक पटेल यांनी शेतकरी आत्महत्येबाबत बोलताना म्हटलं की, शेतरकऱ्यांनी कितीही मेहनत केली तरीही त्यांची पुढची पिढी गरीबीतच आहे. इथे अदानी, अंबानीला काहीच कमी पडत नाही. गुजरातमध्ये सरदार पटेल यांच्या स्मारकाच्या नावाने नागरिकांना मुर्ख बनवून राज्य केल्याचं त्यांनी म्हटलं.


नागपूरहून पॅराशूट बनवून मुंबईत आणून बसविले, त्याला शेतकऱ्यांचे दुःख कसे कळणार अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हार्दिक पटेलांनी तोफ डागली. पाटीदार समाज, मराठा समाज यांच्या आरक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, ज्यांची संख्या जास्त त्यांना तेवढी भागीदारी मिळाली पाहिजे. जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत कुणाला बरोबरीचा हिस्सा मिळणार नाही.


मंत्री आणि नेत्यांना दोषी ठरविण्यापेक्षा आपल्याला स्वतःला बदलावे लागणार आहे. भाजपचे सरकार हे हुकूमशाह प्रमाणे वागत आहे. देशाच्या प्रमुख संस्थांवरचा सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास उडाला आहे, तो जागृत होणे गरजे असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं.