मुंबई : आज आपल्याला सरकार विरोधात सर्व लोकांना एकत्र घेऊन लढायला हवे. सर्वांसोबत अन्याय झाला आहे त्यामुळे आपल्याला आता सर्वांना सोबत घेऊन लढायला हवे. सरकार येईल, कधी येणार हे डोक्यातून काढून टाका. सरकार येईल तो आपला बोनस समजा, आपल्याला शस्त्र घेऊन लढायचे आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ऑपरेशन लोटसच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात काही ठिकाणी झालेल्या दंगलीला भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार हा अल्पसंख्यकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी विचार करून केलेला हा प्रयोग आहे असा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते
राज्यातल्या इतिहासातले सर्वात भ्रष्ट सरकार
महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नसून 'काय ते द्यायच' म्हणजे वसुली करण्यासाठी राज्य चालवलं जातंय, अशा शब्दांत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
कोण होतास तू… काय झालास तू..
8 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले. त्यात त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. ज्यावेळी हिंदूंची दुकानं जाळली गेली त्यावेळी महाविकास आघाडीचा एक तरी नेता बोलला का? मला आश्चर्य वाटतं ते संजय राऊत यांचं. मला गाण आठवतं कोण होतास तू… काय झालास तू.. नवाब मलिकांचा तर प्रश्नच नाही. कारण ते हर्बल तंबाखू लावतात… कव्हर फायरिंग म्हणून मलिकांनी मुंबईतून पैसे दिले गेल्याचं सांगितलं.
राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली
देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य आहे. पण या राज्यात सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारचं अस्तित्वच दिसत नाहीये. एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री मानतो. पण आपल्या स्वत: च्या पलिकडे पाहायला तयार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.