मुंबई : मालेगाव, नांदेड आणि अमरावती या महाराष्ट्राच्या तीन मोठ्या शहरात त्रिपुरातील कथित हिंसाचारवरून (Tripura Violance)  दंगल उसळली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रझा अकादमी (Raza Academy) चर्चेत आली आहे. ही रझा अकादमी  तिचं आहे जिच्यावर पुन्हा पुन्हा हिंसा भडकवल्याचा आरोप केला जातो. यापूर्वी 11 ऑगस्ट 2012 मध्ये मुंबईत हिंसाचार झाला होता तेव्हाही रझा अकादमी आरोपीच्या पिंजऱ्यात होती. आता तर रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे. त्यामुळे तिच्यावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी भाजपने केली आहे. तर रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


संजय राऊत यांच्याप्रमाणे नवाब मलिक यांनीही रझा अकादमी आणि भाजपचं कनेक्शन जोडले. भाजपचे नेते आशिष शेलार अकादमीच्या ऑफिसमध्ये बसून बैठका करतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला. पण नवाब मलिक यांनी शेअर केलेला फोटो हा जुना आहे. त्याचा रझा अकादमीशी काहीही संबंध नाही असं म्हणत अशिष शेलार यांनी हे आरोप फेटाळून लावले. एकीकडे महाराष्ट्रात सुरू असलेला हिंसाचार आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण यात भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशी केली जाईल, त्यानंतर जे सत्य समोर येईल, त्याप्रमाणे कारवाई होईल, असे म्हटले आहे. 


 रझा अकादमी नेमकं करते काय?


रझा अकादमीची स्थापना 1978 मध्ये अलहाज मोहम्मद सईद नूरी यांनी केली होती. नूरी हे 1986 पासून रझा अकादमीचे अध्यक्ष आहेत. अकादमीची स्थापना सुन्नी विद्वानांची विशेषत: इमाम-ए-अहमद रझा खान कादरी आणि इतरांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी करण्यात आली होती.  अकादमीने उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये विद्वानांनी लिहिलेली विविध इस्लामिक विषयांची शेकडो पुस्तके प्रकाशित केली आहेत.  एका अहवालानुसार, 1998 पासून ते वेब पोर्टलची देखरेख करते ज्यामध्ये संबंधित संस्था आणि उलेमा यांच्या निर्देशिकांचा समावेश आहे.


रझा अकादमीनं मुंबईत 11 ऑगस्ट 2012 रोजी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चात हिंसाचार झाला होता. त्यावेळी देखील रझा अकादमीवर बंदीची मागणी आली पण पुढे फारसं काही झालं नाही. आता पुन्हा एकदा भाजपने रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे खरंच रझा अकादमीवर बंदी घातली जाते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha