सांगली : राज्यातील विविध ठिकाणांवरुन सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. ही मदत वाढावी यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असं असताना सांगलीमध्ये मात्र पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भाजप नगरसेविका गीता सुतार यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सांगलीतील भाजप नगरसेविका गीता सुतार आणि त्यांचे पती सुयोग सुतार काही कार्यकर्त्यांना घेऊन चादरी आणि चटई मागायला मराठा सेवा संघाच्या कार्यालयात गेले होते. 'तेव्हा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सरकारकडून घेऊन लोकांना वाटप करा, आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना वाटप करत आहोत, असं सांगितलं. यानंतर भाजप नगरसेविका गीता सुतार आणि त्यांचा पती सुयोग सुतार यांनी पूरग्रस्त महिलांना मारहाण करत व अन्नधान्यासहित इतर साहित्यांची नासधूस केली. तसेच मदतकार्य करणाऱ्या लोकांना मारहाण केली', असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.



दरम्यान गीता सुतार यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्या प्रभागातील पूरग्रस्त लोकांची तक्रार आल्यानंतर विचारपूस करण्यासाठी आपण त्याठिकाणी गेलो होतो. यावेळी राजकीय वर्चस्वासाठी वाद झाला. मी तेथे गेल्यावर माझ्यावर मारहाण झाली', असं गीता सुतार यांनी या घटनेनंतर काढलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. तसेच आपली कोणत्याही संस्था, राजकीय मंडळीबद्दल तक्रार नसून कोणाची मनं दुखावली असतील तर मी जाहीर माफी मागते असं देखील या पत्रकात म्हटलं आहे.

पूर ओसरल्यावर सांगलीतील काय स्थिती आहे?