मुंबई : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरकरांसाठी अनेक हात मदतीचे येत आहेत त्यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक गावच दत्तक घेऊन नवा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. प्रताप सरनाईक यांनी पुरामुळे उध्वस्त झालेलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतलं आहे.


महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं उध्वस्त झाली आहेत. ही गावं पुन्हा उभं करण्यासाठी गावकऱ्यांना जीवाचं रान करावं लागणार आहे. या महापुरात घरात होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं आहे. त्यामुळे संसार नव्यानं उभं करणं हे भलमोठं आवाहन या गावकऱ्यांसमोर आहे. मजरेवाडी गावासमोरचं संकट दुर करण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी प्रताप सरनाईक यांनी दाखवली आहे. विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि रोटरी क्लबच्या माधमातून हे गाव पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.


मजेरवाडीत एकूण 325 घरं असून गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजार आहे. गावातल्या प्रत्येक घरात मीठापासनू ते पीठापर्यंत तसेच पोळपाट लाटण्यापासून ते शेगडीपर्यत सर्व उपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. वर्षभर पुरेल इतके अन्नधान्यही पुरवण्यात येणार आहे.

"पूरामुळे प्रत्येकाचं घर चिखलानं भरलं आहे. घरातील संसारपयोगी वस्तू गेल्या आहेत. अशा वेळी प्रत्येकाचा संसार उभा करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माझ्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन अशी अनेक गावं दत्तक घेतली तर संकट लवकर दूर होईल",  अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सध्या सुरु आहे. अन्नधान्य, कपडे,  अंथरुण, इतर महत्त्वाच्या वस्तू अशा वेगवेगळ्या स्वरुपात राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे.

राज्यातील पूरग्रस्त भागासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सहा हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (13 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे सहा हजार कोटी रुपयांची मदत मागणार असल्याचं सांगितलं. तसंच पडझड झालेली घरं पूर्णपणे सरकार बांधून देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.