उस्मानाबाद : तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याची सोय आहे.रेल्वे तिकिटाचं बुकिंग फुल करून दलाल काळाबाजार करतात, त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सिंहासन पुजेचं बुकिंग फुल करून व्हीआयपी लोकांकडून जास्त दक्षिणा उकळत असल्याचा आरोप होत आहे.


तुळजाभवानीच्या रोज सात सिंहासन पूजा होतात. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करुन पुजेप्रमाणे पैसे भरावे लागतात. सोमवारी पहाटे अशी बुकींग सुरु होताच मंदिराच्या पुजाऱ्यांनी आपल्या घरातील सदस्य, शेजारी, दुरवरचे पाहुणे आणि लोकांचा आधार कार्डवर पूजेची बुकिंग केली. त्यामुळे अवघ्या चार तासात पुढच्या आठ महिन्यांची बुकिंग फुल होवू लागल्यानं मंदिर संस्थानला बुकिंग थांबवावी लागली.


1 जानेवारी 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंतचं बुकिंग करण्यासाठी पहाटे 4 वाजता बुकिंगला सुरुवात झाली. बुकिंगसाठी 3 वाजेपासूनच रांगा लागल्या होत्या. बुकिंग उघडताच 4 तासातच 242 पुजा बूक झाल्या.


तुळजाभवानीच्या रोज सकाळी पाच आणि संध्याकाळी दोन अशा सात सिंहासन पूजा होतात. दह्याची पूजा असेल तर 700 रुपये तर श्रीखंडाने पूजेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पुजाऱ्यांनी 2 लाख 42 हजार पदरमोड करुन पूजा बूक केल्या आहेत, असा आरोप होत आहे. काही पुजाऱ्यांचा मंदिरात येणारे नेते, श्रीमंत भाविकांकडून लाखो रुपये घेवून पूजेचा मान विकण्याचा व्यवसाय आहे, असंही बोललं जात आहे.


तुळजाभवानी मंदिरातील देवीचे ऐतिहासिक अलंकार गायब झाल्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. तरीही मंदिरातील गैरप्रकार थांबत नाहीत. आता बूक झालेल्या पुजेच्या पावत्या घेवून जे भाविक मंदिरात येतील त्यांना दर्शनाआधी आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय मंदिर प्रशासन घेण्याच्या तयारीत आहे.