उस्मानाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लीम मतदारांसाठी भाजपचा प्रचाराचा मुद्दा ठरल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या राजवटीत किती मुस्लीम मुलांना दहशतवादी म्हणून अटक केलं, देशभरात किती हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या याची आकडेवारीच भाजपचे नेते मुस्लीम समुदायाला सांगत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली होती.
'जमियत उलेमा'चे 40 मौलवी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. सह्याद्री गेस्ट हाऊसवर ही बैठक झाली. मुस्लीम समाजाला आरक्षण, वक्फच्या जमिनीचा मुद्दा या बैठकीचा अजेंडा होता. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील मुस्लीम समुदाय आणि आताचा मुस्लीम समुदायाला मिळालेल्या वागणुकीची तुलना केली. तसेच आधीचं सरकार आणि भाजप सरकार यांच्या कार्यकाळात झालेली मुस्लीम युवकांची धरपकड यांची आकडेवारीसह मांडणी करत तुलना करुन पाहण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मौलवींना केलं.
राज्यात या सरकारच्या काळात मुस्लीम मुलांना त्रास दिला गेला नाही, दंगली कमी झाल्या, मुस्लीम मुलांची धरपकड कमी झाली इत्याही गोष्टी भाजपला मुस्लीम समाजाला दाखवायच्या आहेत. आगामी निवडणुकीत हाच भाजपचा मोठा प्रचाराचा मुद्दा असणार असल्याचंही यातून स्पष्ट दिसून येत आहे.
भाजप सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर चार वर्षात प्रथमच अशा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुस्लीम आरक्षणासारख्या विषयांवरही चर्चा झाली. या चर्चेत मुस्लीम समाजाने विविध समस्या आणि मागण्या मुख्यमंत्र्यांनी ऐकूण घेतल्या आणि त्यावर समाधानकारक उत्तरही दिली, अशी माहिती जमियत उलेमा हिंद मौलवींनी दिली. तसेच आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असून सरकार यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती या बैठकीत दिल्यांचं मौलवींनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ