Maharashtra Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यात भाजप आक्रमकपणे मैदानात उतरल्याचं दिसतंय. एक दोन नव्हे तर चार राज्यातील मुख्यमंत्र्यांना भाजपने प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), भजनलाल शर्मा, पुष्कर सिंह आणि प्रमोद सावंत हे चार मुख्यमंत्री सध्या राज्यात भाजपचा प्रचार करताना दिसत आहेत. 


अब की बार 400 पार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने देशभर दिलेले घोषवाक्य. एवढंच नाही तर राज्यातही भाजपने 45 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलंय. हेच लक्ष पूर्ण करण्यासाठी भाजपने एक नव्हे तर तब्बल चार राज्यातील मुख्यमंत्री मैदानात उतरवले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यानंतर आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई महानगरातील मैदानात उतरलेत. योगी आदित्यनाथ यांची 18 मे रोजी नालासोपारा येथे जाहीर सभाही होणार आहे. 


योगी आदित्यनाथ 


निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाडा येथे योगींच्या पाच सभा झाल्या. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात योगींची एकही सभा महाराष्ट्रात झाली नव्हती. मात्र आता योगी आदित्यनाथ यांची नालासोपारा येथे सभा होणार असून उत्तर मध्य मुंबईत योगींच्या रोड शोचे आयोजन करण्यात आलं.


पालघर येथील नालासोपारा, वसई आणि विरार या भागात सर्वाधिक उत्तर भारतीय मतदार असल्याने योगींची सभा आयोजित करण्यात आली. तर दुसरीकडे उत्तर मध्य मुंबईतही उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगींच्या रोड शोचे आयोजन 18 मे रोजी करण्यात आलं आहे.


भजन लाल शर्मा


राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघांत यामिनी जाधव यांच्यासाठी 11 मे रोजी प्रचार केला. दक्षिण मुंबईतील काळबादेवी येथे राजस्थानी संमेलन घेत त्यांनी राजस्थानी मतदारांना साथ घातली. एवढेच नाही तर भाईंदर, दहिसर या भागात जात त्यांनी राजस्थानी मतदारांना साथ घातली.


प्रमोद सावंत


गोव्याचे मुख्यमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी -सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते रत्नागिरीत, रायगड येथील छोट्या छोट्या बैठकांमध्ये प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली.


पुष्कर सिंह धामी 


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तर मध्य, उत्तर पूर्व पालघर आणि ठाण्यात प्रचार केला. यावेळी मुंबई, ठाणे, पालघर लोकसभा मतदार संघात राहणाऱ्या उत्तराखंडमधील मतदारांना जोडण्याचा प्रयत्न धामी यांनी केल्याचे पाहायला मिळाले.


दरम्यान, भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 18 मे रोजी उत्तर भारतीय मतदार असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील नालासोपारा येथे जाहीर सभा घेत आहेत. नालासोपारा, वसई विरार या भागात जवळपास 40 टक्के उत्तर भारतीय मतदार असून, या भागात योगी जोरदार शक्तिप्रदर्शन करतील.


एकूणच काय राज्यात मिशन 45 प्लसचे लक्ष भाजपने ठेवलंय. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी भाजपला प्रत्येक मतदार हा महत्वाचा आहे. त्यामुळे चार राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा आणि विशेषतः योगींच्या सभेचा राज्य भाजपला किती फायदा होतो याचे उत्तर येत्या 4 जूनला कळेल. 


ही बातमी वाचा: