मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी संप पुकारला असून न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. आता या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण तापत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश मानावा आणि संप मागे घ्यावं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावर राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. 


राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपावर न्यायालयाने भाष्य केलं असून कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा आणि संप मागे घ्यावा असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते. शरद पवार कसे काय घोषणा करतात. उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली पाहिजे असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. 


आपल्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने जर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, "कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. राज्य सरकार केवळ चेक हातात घेऊन फिरत होते."


इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 


दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालयात यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. कामगार संघटनेला या संपावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. शुक्रवारच्या सुनावणीत या संपवार तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती एस. तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं स्पष्ट केलं की, सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं योग्य नाही. त्यामुळे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले.


महत्वाच्या बातम्या :