Chandrakant Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करून देशातील जनतेला मोठा दिलासा दिला. त्याबद्दल पंतप्रधान मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर महाराष्ट्रात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही आपण करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले.


ते म्हणाले की, मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतील देशातील नऊ कोटी गॅस ग्राहक महिलांना बारा सिलिंडरपर्यंत प्रति सिलिंडर दोनशे रुपये सबसिडी जाहीर केली आहे. तसेच सिमेंट आणि स्टीलच्या आयातीवरील कर कमी केला आहे तर निर्यातीवरील कर वाढविला आहे. परिणामी सिमेंट व स्टीलचे दर कमी होतील. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासोबतच मोदी सरकारच्या या निर्णयांमुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत मिळेल.






चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलवरील कर पाच रुपये तर डिझेलवरील कर दहा रुपये कमी केला होता. त्यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर देशभरातील 22 राज्यांनी त्या त्या राज्यात इंधनावरील कर कमी केल्यामुळे तेथील जनतेला आणखी दिलासा मिळाला. परंतु, महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्यास नकार दिला. परिणामी महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये लोकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते पण महाराष्ट्रात मात्र दिलासा नाही. मोदी सरकारने आता दुसऱ्यांदा इंधनावरील कर कमी केल्यानंतर तरी महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलासा दिलासा पाहिजे व हे कर कमी केले पाहिजेत. महागाईवर भाषणे करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून महागाई कमी करण्यास हातभार लावला पाहिजे.'