पुणे: एखाद्या नेत्याच्या वक्तव्याबद्दल समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते, गैरसमज होऊ शकतो, तो दूर करणे ही आपली जबाबदारी आहे. ब्राह्मण समाजाविषयी आपल्या सहकाऱ्यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यांना योग्य ती समज देण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यातल्या विविध ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी बोलवलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या काही सहकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी होती. मी आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना बैठक आयोजित करायला सांगितले होते. या बैठकीत अनेक ब्राह्मण संघटना बैठकीला हजर होत्या. आपल्या पक्षातील नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अस्वस्थता होती. पुन्हा या पद्धतीने कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात बोलू नये अशा सूचना आपण त्यांना दिल्या आहेत. धोरणांच्या विरोधात बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे."


ब्राह्मण समाजाची आरक्षणाची मागणी
शरद पवार म्हणाले की, "अलिकडच्या काळात ग्रामीण भागातला हा वर्ग नागरी भागात येतोय. त्यामुळे नोकरीमध्ये त्यांना अधिक संधी मिळावी. त्यासाठी आरक्षणाची गरज असल्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली. त्यावेळी त्यांना आरक्षणाचे सूत्र समजावून सांगितलं. पण इतरांच्या आरक्षणाला विरोध करु नये असं मी आवाहन केलं. विविध समाजासाठी विकासाला, व्यवसायाला मदत करण्यासाठी महामंडळ स्थापण करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी परशुराम महामंडळ असं नावही सूचवण्यात आलं. तेव्हा हा विषय आपल्या अधिकारात नाही, तो राज्याकडे आहे. आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत ब्राह्मण समाजाची बैठक घडवू असं आश्वासन दिलं. 


शरद पवारांनी समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते, दादोजी कोंडदेव हे देखील शिवरायांचे गुरू नव्हते असं शरद पवारांनी म्हटलं होतं. तसेच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळेही ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय.त्यातच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. तसेच समाजा-समाजामध्ये दरी निर्माण होत होती. त्याच धरतीवर शरद पवारांनी राज्यभरातील ब्राह्मण समाजातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.


या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतची नाराजी शरद पवारांकडे मांडण्यात आल्याचं समजतंय. तर दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणाऱ्या मतांबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली आहे. 


या बैठकीसाठी कोण उपस्थित होतं? 
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी
जागतिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष अजित घाटपांडे
समस्त ब्राम्हण समाजाचे काकासाहेब कुलकर्णी  
चित्पावन ब्राम्हण संघाचे अध्यक्ष गाडगीळ गुरुजी
आम्ही सारे ब्राम्हण संघटनेचे भालचंद्र कुलकर्णी 
ब्राम्हण महासभेचे प्रकाश दाते
समर्थ मराठी संस्थेचे अनिल गोरे
ॲमोनोरा टाऊनशी आणि सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे