Chandrakant Patil on Sanjay Raut Press Conference : शिवसेना फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘आरोप झाले, तर निर्दोषत्व सिद्ध करण्याचे अनेक घटनादत्त अधिकार आणि मार्ग आहेत. ते राहिले बाजूला, आरोप करणाऱ्याचं अतिशय असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेनं राऊतांपासून सुरक्षित अंतर राखलं असावं, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.


मागील दोन तीन दिवस मोठी गोष्ट बाहेर काढणार असल्याचा कांगावा संजय राऊत यांनी केला. जगात आजपर्यंत कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही, यांचीच पहिल्यांदा होत आहे, असे हे वागत होते. या सर्वातून शेवटी 'खोदा पहाड निकला चुहा' असं सिद्ध झालं. इतरांविषयी बोलताना अपशब्दांचा वापर करणं ही यांची संस्कृतीच आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असं म्हणणंच धाडसाचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतंच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली असेल, असं म्हणतो. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.






केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्यांची चौकशी झाली, त्यांचं अरण्यरूदन असा हा प्रकार होता. प्रयोग आणखी 'नबाबी' होण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्यायला हवी होती. कदाचित, नाशिकसारख्या दूरच्या ठिकाणांहून माणसं जमवता-जमवता ही जमवा-जमव जमली नसावी. असो. संजय राऊत गेट वेल सून!, असा खोचक टोल चंद्रकांत पाटील यांनी लगावला. शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, यापलीकडे यात शिवसेना कुठेच नव्हती. त्यामुळे राऊत मध्ये-मध्ये बाळासाहेब, शिवसेनेचं नाव ओढून-ताणून घेत होते. उद्धवजी तर दूरच, पण ज्या आदित्य ठाकरेंना पर्यावरणाचा हवाला देत प्रकल्पावर कारवाई करायला राऊतांनी सांगितलं, तेही तिथे नसावे?, असेही पाटील म्हणाले.



खासदार संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे...


मन साफ असेल तर कुणाच्या बापाला घाबरणार नाही
शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी भाजपने पवार कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला. मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता असं खासदार संजय राऊत म्हणाले.



आम्ही अतिरेकी हल्ला परतवला -
आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली असं खासदार संजय राऊत म्हणाले. 


केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गां*ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


फडणवीसांच्या काळात 25 हजार कोटींचा घोटाळा
फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात  मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे.  भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. 
 
किरीट सोमय्या 'मुलुंडचा दलाल' असल्याचा आरोप
खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याविषयी बोलताना म्हणाले की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असं घाणेरडे राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो मुलुंडचा दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?


पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट सोमय्यांवर आरोप
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले. 


मुनगंटीवार यांच्या घरच्या लग्नात फक्त कार्पेटवर साडे नऊ कोटींचा खर्च
दोन वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार होते. त्या वेळच्या वनमंत्र्यांच्या घरच्या लग्नात अवाढव्य खर्च करण्यात आला. त्या लग्नात कार्पेट हे साडे कोटी रुपयांचे होतं. हे ईडीला दिसलं नाही असं संजय राऊत म्हणाले. 


आपल्या टेलरची ईडीकडून चौकशी
आपल्या मुलीच्या लग्नात मेहंदी आणि नेलपॉलिश करणाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तसेच आपण ज्या ठिकाणी कपडे शिवतो त्या टेलरचीही चौकशी ईडीने केली आहे.


ईडीच्या अधिकाऱ्यांना घाम फुटेल 
जितेंद्र चंद्रालाल नवलानी कोण आहेत, हे ईडीने सांगावे. नवलानीचं नाव ऐकूण दिल्ली ते मुंबईच्या ईडी अधिकाऱ्यांना घाम फुटेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच मुंबईच्या 70 बिल्डराकडून ईडी आणि दलालाकडून वसूली केली जात आहे. 70 बिल्डराकडून किमान 300 कोटी वसूल केले. यात ED चे काही अधिकारी सहभागी आहेत असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला.  


मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार  
देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे नाव मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा असून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवानकडून केबीजी ग्रुपनं 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपकडे आहेत. त्यासाठीचा पैसे कुठून आला याची माहिती फडणवीसांना माहिती आहे.