कोल्हापूर : उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला राज्यभरात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळतोय तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आहे. या बंद संदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, महाराष्ट्रात जी कारवाई सुरू आहे त्यावरून लक्ष वेधण्यासाठी हा बंद केला जातोय. लखीमपूरमध्ये जी घटना घडली त्याला भाजपला का लेबल लावलं जातं आहे. मावळमध्ये तर पोलिसांनी शेतकऱ्यांना शोधून शोधून मारलं होतं. याठिकाणी एका व्यक्तीने ही घटना घडवली आहे. त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. शेतकऱ्यांनी देखील गाडीतील चार जणांना ठेचून ठेचून मारलं, असं पाटील म्हणाले.
Maharashtra Bandh Live Updates : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा बंद म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचं काम आहे. खुर्ची टिकवायची तर शरद पवार यांचे ऐकावं लागतं. म्हणून शिवसेना या बंद मध्ये उतरली आहे. शिवसेनेच्या मनात हा बंद करणं नव्हतं, असंही ते म्हणाले.
पाटील म्हणाले की, अजित पवार हे हुशार राजकारणी आहेत. अजित पवारांनी इंधन जीएसटीमध्ये येऊ दिलं नाही. नाहीतर आता पेट्रोल डिझेल प्रतिलीटर 30 रुपयांनी कमी दरात मिळालं असतं. अजित पवार यांनी इंधन जीएसटीमध्ये आणावं उद्या दर कमी होईल, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे : पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी ते क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. राज्यात ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे, असं पडळकर म्हणाले.
पडळकर म्हणाले की, तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे. मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करतायेत. आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत. त्याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा आहे, असं पडळकर म्हणाले.