पिंपरी : भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. आता त्यांना राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारी वाटत नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजपने  गुंडांचा पक्ष अशी ओळख निर्माण केली आहे. भाजपने जाणीवपूर्वक पक्षात गुंडांची आयात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यावर नाराजी व्यक्ती केली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

आम्ही 'अरे'ला 'कारे' करणारी माणसं आहोत. कोणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला कोणी गेलं, तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही, असही अजित पवार यांनी ठणकावलं.

काँग्रेससोबत आघाडीसाठी चर्चा सुरु आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन उमेदवार निश्चित करु. सन्मानपूर्वक आघाडी झाल्यास आमची भूमिका सकारात्मक आहे. मात्र सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास पिंपरीत 128 जागा स्वबळावर लढवण्याची आमची तयारी आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांचे निकटवर्तीय आझम पानसरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादीने आझम पानसरेंवर कोणताही अन्याय केलेला नाही, मात्र त्यांनी पक्ष का सोडला हे माहित नाही."