Vinod Tawde :  भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची आज, रविवारी घोषणा झाली आहे. यामध्ये माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तावडे हरियाणाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. राष्ट्रीय चिटणीस पदावरून तावडे यांची आता राष्ट्रीय सरचिटणीस पदावर पदोन्नती झाली आहे. पंतप्रधानांच्या मन की बातचे समन्वयक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ही समन्वयक झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी परिपत्रक काढून यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून दूर असलेले तावडे आता राष्ट्रीय राजकारणात, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.  


2019 मध्ये विधानसभेला तिकीट नाकारलेल्या दोन मोठ्या नेत्याचं एकापाठोपाठ पुनर्वसन कऱण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. शनिवारी काल चंद्रशेखर बावनकुळेंना विधानपरिषद तिकीट दिलं आहे. तर आज विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीसपदावर पदोन्नती दिली आहे. फडणवीस सरकारमध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर निवडून गेले होते. फडणवीस सरकारमध्ये तावडे यांनी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती.मात्र, 2019 च्या निवडणुकीत तावडेंना तिकिट नाकारले होते. त्यामुळे तावडे नाराज होते. पण आता त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. विनोद तावडेंने याआधी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस, मुंबई भाजप अध्यक्ष आणि 12व्या आणि 13व्या लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समितीचे प्रमुख सदस्यपद भूषवलं आहे. 2019 मध्ये आपल्याला तिकिट नाकारल्यामुळे तावडे नाराज होते. पण राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत विनोद तावडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.


भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी परिपत्रक काढून एक घोषणा केली. यामध्ये पाच जणांना मोठी जबाबदारी दिली. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचं नाव आहे. तर झारखंडच्या आशा लकड़ा आणि  बिहारचे ऋृतुराज सिन्‍हा यांनाही जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय पश्चिम बंगालच्या भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांना राष्‍ट्रीय प्रवक्‍ता करण्यात आलेय.