ST Worker Strike: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात एस टी चा विषय अत्यंत ज्वलंत बनलेला अखंड महाराष्ट्राने पाहिलाय. एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदेलनाने राजकारण गेल्या काही दिवसात प्रचंड तापलं आणि आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून एकमेकांवर झाडल्या गेल्या. एस टी च्या विलनीकरणाच्या मुद्दयावर अद्याप काहीच तोडगा निघाला नाही. त्या संदर्भात गेल्या एक दोन दिवसांपासून बैठकांचं सत्र देखील सुरु झालंय. मात्र आता हे वातावरण आणखी चिघळण्याची चित्र आहेत. कारण त्यासंदर्भात एक नवीन अपडेट समोर येतेय. हा संप संपूर्ण महाराष्ट्रात काटोकोरपणे पाळला गेला असला तरी, या पवित्र्याचा विरोधाभास आज पहायला मिळाला. धुळे आगारातून आज पहिली बस बाहेर निघाली. संप असून देखील आणि एस टी कर्मचाऱ्यांचा लढा अद्याप संपलेला नसताना देखील धुळ्यात हा पवित्रा घेण्यात आला आहे.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन स्थगित होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने धुळे आगारातून पोलीस संरक्षणात बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळे यांच्या आदेशानुसार धुळे आगारातून नरडाणा आणि धनुर येथे जाण्यासाठी बसेस काढण्यात आल्या. बसेस बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच आवर घातल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भरती झालेले मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या चालक आणि वाचकांच्या मदतीने बस काढण्यात आली...यावेळी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्याने गांधीगिरी करत चालकाचा सत्कार केला.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी हे आंदेलन सुरुच आहे. शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदेलन देखील करण्यात आलं होत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांवर शासनानं निलंबनाची कारवाई केल्यानं संपकरी आणखी संतापलेत. त्यात परिवहनमंत्र्यांनी संप मागे घ्या, निलंबन मागे घेऊ असा शब्द दिलाय. तरी, संप अजूनही मागे घेतलेला नाही. त्यात पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांशी चर्चा होणार आहे. बैठकांमध्ये आंदोलक नेते पुढची भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे आता संप अद्याप संपलेला नसतानादेखील धुळ्यातल्या या घटनेमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत.