जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकवीस पैकी एकवीस जागा आमच्या येणार असून महविकासा आघाडीचाच अध्यक्ष होणार असल्याचं मत एकनाथ खडसे यांनी मतदान प्रसंगी मुक्ताई नगर येथे व्यक्त केले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीकडून सहकार पॅनल उभे करण्यात आले आहे. या पॅनल मधील अकरा जागा या अगोदरच बिन विरोध झाल्या आहेत, उर्वरित दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. या दहा जागा ही आम्हालाच मिळतील असा दावा करीत सर्व चे सर्व एकवीस जागावर सहकार पॅनलला यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. 


मुक्ताई नगर येथे मतदान केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करताना म्हटल आहे की, या निवडणुकीत भाजप कडे दिग्गज उमेदवार होते, मात्र त्यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊन पळ काढला आहे. उर्वरित दहा जागा ही महाविकास आघाडीला मिळणार असून आमचाच अध्यक्ष होईल असा विश्वास ही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.


धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेसाठी निवडणुका
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज सतरा पैकी दहा जागांसाठी मतदान होत आहे. 17 पैकी सात जागांवर बिनविरोध निवड झाली असून आता शिल्लक राहिलेल्या दहा जागांसाठी वीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.


सातारा जिल्हा बँक निवडणुकीत तणाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये हमरीतुमरी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानादरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार व उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कुडाळ येथे झालेल्या या वादामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.  आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे. जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे संचालक म्हणून निवडून गेले आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाने यंदा शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. ज्ञानदेव रांजणे यांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, रांजणे यांनी माघार घेतली नाही. त्यानंतर आज मतदानाच्या दिवशी दोन गटात हमरीतुमरी झाली.