Ahmednagar News: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील उंबरे गावामध्ये दोन दिवसांपूर्वी दोन समाजात झालेल्या वादाला (Disputes) आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात आणखी दोन मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलींना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर दोन समाजांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर परस्परविरोधी तक्रार देखील राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन मुलींनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आता आठ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कथित धर्मांतर करण्याचे रॅकेट तर सुरू नाही ना असा सवाल माजी राज्यमंत्री  शिवाजी कर्डीले यांनी उपस्थित केला आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


अल्पवयीन मुलीचे फोटो आणि चॅटींग सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी या मुलींना देण्यात येत होती. तसेच या माध्यमातून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या मुलींना या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर उंबरे गावातील आवेज शेख आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रार्थनास्थळाची  तोडफोड करण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला होता. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालं आहे. 


आणखी दोन अल्पवयीन मुलींनी सुद्धा अशीच तक्रार केली आहे.  शिकवणीला जात असलेल्या शिक्षिकेमार्फत ओळख झालेल्या मुलांकडून अशाच प्रकारे धमकावले जात असल्याचं या मुलींना म्हटलं आहे. शिकवणीला जात असलेल्या  शेख या शिक्षिकेने त्यांच्या समाजातील मुलांशी ओळख करून देत सेल्फी काढण्यास सांगितले असं देखील या मुलींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, ही शिक्षिका देखील मुलींवर त्यांच्या समाजातील काही अटी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक खुलासा देखील या मुलींनी केला आहे. तर ओळख झालेल्या मुलांकडून लग्न करण्याचे मेसेज सतत येत असल्याचा आरोपही या मुलींनी केला आहे. तसेच जर लग्न करण्यास नकार दिला तर हे मेसेज व्हायरल करण्याची धमकी देखील या मुलींना देण्यात आल्याचं समोर आलं आहे. 


दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला होता. पोलीस आता यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. राज्यात सध्या धर्मांतराची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे राहुरी तालुक्यातही तोच प्रयत्न तर नाही ना होत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Buldhana Accident : मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी