मुंबई : राज्यात जीएसटीचा सुधारित प्रस्ताव मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेने सुचवलेले तीन बदल भाजपने मान्य केल्यानंतर जीएसटीला हिरवा कंदील मिळाला आहे. सुधारित प्रस्ताव आज कॅबिनेटमध्ये मंजूर केला जाईल.


जीएसटीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात चर्चा झाली. शिवसेनेने सुचवलेले तीन बदल मान्य करण्यात आल्यानंतर जीएसटीच्या सुधारित प्रस्ताव मान्य होण्याचा मार्ग मोकळा झाला.

शिवसेनेने सुचवलेले तीन बदल कोणते?

  • मुंबई महापालिकेला नियमितपणे पैसे मिळावेत.

  • पैसे मागण्यासाठी राज्य सरकारपुढे प्रत्येक वेळी हात पसरावे लागू नयेत

  • दरवर्षी जी चक्रवाढ दिली जाते, ती वाढवून द्यावी


जीएसटीचा सुधारित मसुदा अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर पाठवण्यात आला होता. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कालच भेट होणार होती. मात्र शिवसेनेने अभ्यासासाठी वेळ मागितला. त्यानुसार आज भेट झाली. बैठकीसाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई उपस्थित होते.

बैठकीनंतर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरेंच फोनवर बोलणं झालं. त्यामुळे जीएसटीचा तिढा आता सुटला आहे. राज्य सरकारने जीएसटीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे जीएसटीला शिवसेनेचा पाठिंबा असेल, हे जवळपास निश्चित झालं आहे.

उद्धव ठाकरेंना घरी जाऊन जीएसटीचं प्रेझेंटेशन देणं घटनाबाह्य : अशोक चव्हाण

जीएसटी मसुद्यावरुन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालं आहे.

उद्धव ठाकरेंना घरी जाऊन जीएसटीचं प्रेझेंटेशन देणं म्हणजे घटनाबाह्य केंद्र निर्माण करण्याचा प्रकार असल्याची सणसणीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.