भाजप आमदारावर सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण केल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2017 11:23 AM (IST)
यवतमाळ : यवतमाळमधील भाजप आमदार राजू तोडसाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. तोडसाम यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आमदाराच्या सोशल मीडियाचे प्रमुख रुपेश टाक यांनी केली आहे. राजू तोडसाम हे यवतमाळमधील आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. रुपेश टाक यांनी तोडसाम यांच्याविषयी बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आल्याचं वृत्त आहे. 'मला अडीच वर्षांचा अनुभव आहे, आमदार बोगस आहे, त्याच्यामागे वेळ आणि पैसा घालवू नका' असं व्हॉट्सअॅप पोस्टमध्ये दिसत आहे. दरम्यान, बदनामीकारक मजकूर लिहिल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी टाक यांना समज दिली, मात्र कुठल्याही प्रकारची मारहाण केली नसल्याचा दावा आमदार तोडसाम यांनी केला आहे. मारहाण झालेल्या रुपेश टाक यांनी अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दिली नसून आपल्याला मारहाण झाल्याचा दावा सोशल मीडियावरच केला आहे.