मुंबई: लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आज वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. चिपळूणमध्ये जन्मलेली ही कोकणकन्या आज लोकसभेचं अध्यक्षपद भूषवत आहे. सुमित्रा महाजन यांचा जन्म 12 एप्रिला 1943 मध्ये झाला.

बर्थडे स्पेशल

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 2014 मध्ये सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्षपदी वर्णी लागली.

लोकसभेच्या अध्यक्षपदी सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झाल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी खास ठरली. पण, महाजनांच्या निवडीच्या बातमीनं चिपळूणकर सर्वाधिक सुखावले. कारण, चिपळुणात लहाणाची मोठी झालेली ही कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाली.

सुमित्रा महाजन, अंत्यत हुशार आणि तितकचं प्रसन्न व्यक्तिमत्व. इंदूरमधून तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून जाणाऱ्या महाजन या मूळच्या कोकणातील चिपळूणच्या.

चिपळूणमधील साठे कुटुंबात सुमित्रा यांचा जन्म झाला. साठ वर्षापूर्वीच्या चिपळुणातील बापट आळी ते चिंचनाका या दरम्यान साठे कुटुंबाचं निवासस्थान होतं. सुमित्रा महाजन यांचं प्राथमिक शिक्षण बापट आळीतील कन्या शाळेत झालं.



साठे कुटुंबावर संघाची मोठी छाप. त्यामुळे संघाच्या कार्याला अवघ्या कुटुंबानच आधीपासून वाहून घेतलेलं. साठेंकडे त्याकाळी हेडगेवारांसह अनेक नेत्यांची ये-जा असे. महाजनांचे वडील आप्पासाहेब साठेंना तर हिंदू-मुस्लिम अशा दोनही समाजात मानाचं स्थान होतं. ज्याची आठवण आजही चिपळूणात आवर्जून काढली जाते.

अभ्यासासह अनेक कलाप्रकारात प्राविण्य

शालेय जीवनापासूनच सुमित्रांकडे अंत्यत हुशार मुलगी म्हणून पाहिलं जातं होतं. अभ्यासाबरोबर संगीत, नृत्य, कथाकथन, नाटकं अशा प्रत्येक कलाप्रकारात सुमित्रा या नेहमीच आघाडीवर असत.

शालेय शिक्षणानंतर महाजनाचं पुढचं शिक्षण चिपळुणातल्याच युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झालं. याठिकाणी त्यांनी आठवी ते जुनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं. चिपळूनातच लहाणाच्या मोठ्या झालेल्या सुमित्रा लोकसभाध्यक्ष झाल्यानं कोणत्या चिपळूणकराला  आभाळ ठेंगण वाटणार नाही. पण तरीही सर्वाधिक आनंद झाला तो म्हणजे महाजनांच्या वर्गमैत्रीण सरोज नेने यांना.



ज्या मैत्रीणीच्या सहवासात संपूर्ण  बालपण गेलं, तीच मैत्रीण आज आपल्या कर्तृत्वानं एवढ्या उच्च पदावर पोहचली. त्यामुळे बालपणीच्या आठवणींनी नेने यांना गहिवरुन आलं.

सलग पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाजन, चिपळूणात येतात ते अंत्यत सामान्य महिलेप्रमाणे.

महाजन चिपळूणात आल्या आणि आपल्या या मैत्रीणींच्या भेटीविनाच गेल्या असं कधी झालंच नसेल. लोकमान्य टिळक स्मारकाच्या वाचनालयाशी तर महाजनांचा जिव्हाळ्याचा संबंध. दीडशे वर्ष जुन्या या वाचनालयाला महाजन आवर्जून भेट देतात. याच वाचनालयात महाजनांनी आजवर शेकडो पुस्तकं वाचून काढली आहेत.



आप्पासाहेब साठे अर्थात सुमित्रा महाजन यांच्या वडिलांच्या नावानं इथं मोठा सभागृह बांधण्यात आला आहे. याबरोबरच अनेक वास्तू उभी करण्यात महाजनांचं मोलाचं सहकार्य राहिलं आहे. महाजनांचं हे काम आपल्या मातीशी असलेली बांधिलकी अधोऱेखित करतं.

सुमित्रा महाजन या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला लोकसभाध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या. ज्याचा चिपळूणकरांबरोबरच प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे.