मुंबई: गुजरातच्या सीमेवरील दीव-दमणच्या कडैया गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे वृत्त ऐकून अनेक पोल्ट्रीचालक शेतकरी हैराण झाले आहेत. पण गुजरातमधील दमण भागातील बर्ड फ्लूची लागण ही बदकांमध्ये आढळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.

शिवाय, पोल्ट्रीतील ब्रॉयलर पक्षी हा पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा गुजरात फार्मर्स कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष अन्वेष पटेल यांनी दिला आहे.

दमन जिल्ह्यातील कडैया गाव हे बाधित क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. संपूर्ण दमन जिल्हा 'देखरेख झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कुठेही काहीही कारवाई झालेली नाही. संपूर्ण गुजरातमध्ये जेथे जेथे व्यापाऱ्यांची अडवणूक वा दुकाने बंद करण्याचे आदेश आले, त्या ठिकाणी गुजरात फार्मर्स कमिटीने संवाद साधून संबंधित कारवाई मागे घेण्यास भाग पाडले आहे, असे पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, गुजरात आणि महाराष्ट्रात काही माध्यमांमधून विपर्यस्त वृत्त आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत बाजार भाव पडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. सध्याच्या घटनेत घाबरण्यासारखे काहीही नाही. नेहमीसारखा बाजार सुरळीत असून, थंडीमुळे चिकन आणि अंडयांना जोरदार मागणी आहे. त्यामुळे पॅनिक सेलिंग करु नये, असे आवाहन पटेल यांनी केले.